Dhayari Phata: धायरी फाटा उड्डाण पुलाला भेग?
Dhayari Phata:

पूल सुरक्षित असल्याचा महापालिकेचा दावा
पुणे : धायरी फाटा येथील आमदार रमेश वांजळे उड्डाण पुलावर भेगा पडल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, या भेगा उड्डाण पुलाच्या संरचनेतील नसून ज्वाइंट एक्स्पान्शनमधील असल्याने पुलाला कोणताही धोका नसल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे.
धायरी, नांदेड, खडकवासला आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने २०११ मध्ये हा पूल उभारला. येथून दररोज हजारो वाहनांसह डंपर, मिक्सर, ट्रक आणि पाण्याचे टँकर यांसारख्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान उड्डाण पुलावरील रस्त्यावर भेगा दिसून आल्याने शिवसेनेचे विभागप्रमुख महेश पोकळे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी महापालिकेचे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि सल्लागार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले, की या ठिकाणी मोठा आणि लहान असे दोन कालवे समपातळीत नसल्याने उड्डाण पुलासाठी तिरपे गर्डर बसविले आहेत.
दोन गर्डरदरम्यान ताण सहन करण्यासाठी ज्वाइंट एक्स्पान्शनची जागा ठेवली जाते. त्यावर लोखंडी प्लेट, सिमेंट काँक्रीट आणि डांबराचा थर दिला आहे. कालांतराने डांबराच्या थराला भेग पडल्याने ज्वाइंट एक्स्पान्शन दिसू लागले आहे. ही दुरुस्ती तातडीने करण्यात येणार असून, उड्डाण पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे गोजारे यांनी स्पष्ट केले.





