पिंपरी | अल्पसंख्यांक विकास महासंघाचे धरणे आंदोलन स्थगित

पिंपरी, (प्रतिनिधी) – मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी अल्पसंख्यांक विकास महासंघाच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन 19 व्या दिवशी स्थगित करण्यात आला. याकालावधीत राज्यातील विविध मंत्री व मान्यवरांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिली.
या धरणे आंदोलनाच्या काळात शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिाकरी, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांनी आंदोलकांची भेट घेत पाठिंबा जाहिर केला. तर संघटनेच्या वतीने विरोधी विधानसभा पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्यांक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी नगरसेविका आशा धायगुडे , सारंग कामतेकर यांनी आज आंदोलकांची भेट घेत,या मागण्यांकरिता मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी शाह जमातचे मोहसीन शाह, काँग्रेसचे हरीश डोळस, सेल्वराज अॅन्थोनी, रिपाइंचे वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, आनंद घेडे, जीवन घोंगडे, इक्बाल अन्सारी, हाफीज कुरेशी, महेबूब शेख, सालार शेख, ख्वाजा नदाफ, साजिद शेख, प्राध्यापक नरेंद्र पवार, बाबू कुरेशी, ख्वाजाभाई शेख, रिपाइंचे बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.





