Dharashiv News : धाराशिवमध्ये शेतकऱ्यांवर ‘दंडे’शाही; पोलिसांना पाचारण करून लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण

धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवनचक्की कंपनीकडून शेतात उभ्या केलेल्या विद्युत् टॉवरचा योग्य मोबदला मिळावा, अशी माफक अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठ्यांसह शेतातील उसाने अमानुष मारहाण केली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला देऊन काम करा अन्यथा काम थांबवा, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर शनिवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.
गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे २ टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मोबदला मिळाला आहे तेवढंच मोबदला दुसऱ्या कंपनीने द्यावा, अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी टॉवरचे काम थांबवले होते. मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. तसेच कुठलीही भीड भाड न राखता लाठी काठी अन् उसाने शेतकऱ्यांना हाणामारी करण्यास सुरुवात केली.
यावेळी वाशी येथील नगरसेवक राजु कवडे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी शेतकरी आणि नगरसेवक राजु कवडे यांच्यावर देखील अमानुष लाठीमार केला. हे नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचे सांगत पोलिसांनी हात वर केले. याशिवाय, पोलिसांनी तीन जणांविरोधात शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा देखील नोंद केला आहे.





