बीड : मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी काही थांबायचे नाव घेईनात. एकीकडे खंडणी आणि देशमुख खून प्रकरणात राजीनाम्याची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांची परळीमधील जिरेवाडी येथील जमीन बळकावली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सारंगी महाजन यांनी फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी धनंजय मुंडे यांनी माझी परळीमधील जमीन हडपली. धनंजय मुंडे हा माझा भाचा आहे. त्याने मला गोड बोलून परळीला बोलावलं आणि माझ्याकडून जमिनीच्या कागदोपत्री सह्या घेतल्या. साडे ३ कोटींची जमीन ही फक्त २१ लाखांना माझ्याकडून घेतली गेली. या सगळ्याला पंकजा मुंडे यांचीही मूकसंमती होती. त्या ही धुतल्या तांदळाच्या नाहीत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी, अशी विनंती सारंगी महाजन यांनी फडणवीस यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी माझी फसवणूक केल्याचे मी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की योग्य तो न्याय केला जाईल. लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही निश्चिंत राहा, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे सारंगी महाजन यावेळी म्हणाल्या. तसेच परळीचे पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये साटंलोटं आहे असेदेखील त्या म्हणाल्या आहेत.