Dhanjay Munde : धनंजय मुंडेंचे राजीनाम्यानंतर पहिले ट्विट; म्हणाले “माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून…”

बीड: देशमुख हत्या प्रकरणातील मन सुन्न करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी सर्व स्तरातून तीव्र स्वरुपात निषेध नोंदविण्यात येत आहे. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत होते. अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
याबाबतची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी एक्सवरून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिले असल्याचे सांगितले. या ट्वीटमध्ये मुंडेंनी देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले असल्याचे देखील मुंडेंनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
धनंजय मुंडेंचे ट्वीट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025





