Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचा मार्मिक प्रवास कार्यकर्त्यांसमोर मांडला. जन्मानंतर चार महिने डोळे उघडले नव्हते, लिव्हरचा जन्मजात त्रास होता, तरीही देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने आजवर अनेक संकटे पार केल्याचे (Dhananjay Munde) त्यांनी सांगितले. भायाळा येथे नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे यांना वेगळ्याच भावनिक आणि आक्रमक रूपात पाहायला मिळाले. गेल्या सव्वा वर्षातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुंडे म्हणाले, “माझ्यावर अनेक आघात झाले, अनेकांनी टीका केली. पण मी सव्वा वर्ष शांत राहिलो. जर माझ्या गप्प राहण्यामध्ये एवढी मोठी ताकद असेल, तर मी बोलायला लागल्यावर काय होईल, याचा विचार करा…” Dhananjay Munde विरोधकांच्या सातत्याने होणाऱ्या टीकेला त्यांनी यावेळी चांगलाच टोला लगावला. कार्यक्रमाला उपस्थित समर्थकांच्या डोळ्यांत मुंडे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा राग आणि ते पुन्हा जोमाने सक्रिय होत असल्याचा आनंद, अशा दोन्ही भावना स्पष्ट दिसत होत्या, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. रथात का बसलो नाही? मुंडेंनी उलगडले गुपित कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडे यांना रथावर बसवण्याचा मोठा आग्रह धरला होता. मात्र मुंडे यांनी हा आग्रह नाकारला. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, “रथावर बसायचे असेल तर घोड्याच्या रथावर बसावे लागते, मोराच्या नाही. माझे नाव ‘धनंजय’ आहे, जे अर्जुनाच्या नावांपैकी एक आहे. त्यामुळे कुठल्या रथावर आणि कधी बसायचे, हे मला चांगले ठाऊक आहे.” मुंडे यांच्या या विधानाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या या सूचक आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तराने सर्वांनाच प्रभावित केले. बीड राजकारणात नवी चर्चा बीड जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील कठीण प्रवास उलगडून दाखवला आणि विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला. गेल्या सव्वा वर्षात पक्षातील विविध आरोप आणि राजकीय घडामोडींनंतर प्रथमच मुंडे यांनी अशा आक्रमक आणि भावनिक भाषेत भाष्य केल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.