मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना एका परिचीत महिलेने बलात्काराची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेविरोधात मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. धमकीनंतर मुंडे यांनी ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोन पाठवला मात्र महिलेने पाच कोटी रुपयांची मागणी केली त्यानंतर मुंडेनी पोलीस स्टेशन गाठले. धनंजय मुंडेंच्या तक्रारीमध्ये या महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करुन पाच कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईल फोनची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोनही मुंडे यांनी कुरिअरद्वारे पाठवला होता. मात्र यानंतरही महिलेने आणखी पाच कोटी रुपयांची मागणी करत धमक्या देण्याचे सुरु ठेवल्यामुळे मुंडे यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान चौकशीमध्ये काय समोर येते हे पहावे लागणार आहे.