परळी – मागील काही दिवसांपासून आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आता पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता मुंडे यांनी परळी नगर परिषदेत मोठा निर्णय घेतला आहे. मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापतीपद दिले.
परळी नगर परिषदेत एकूण 32 नगरसेवक निवडून आलेले आणि 3 स्वीकृत असे एकूण 35 नगरसेवक आहेत. यांपैकी जवळपास 30 नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना यांना महिला आणि बालविकास सभापतीपद देण्यात आले.
या व्यतिरिक्त अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती या सर्व सभापती पदांसह स्थायी समितीवर बाजीराव धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान आणि रेश्मा बळवंत यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्यात.
यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.