बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे. पण वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याच वाल्मिक कराडवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य करायला सूरूवात केली आहे. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. काय म्हणाले मनोज जरांगे? संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्याला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला.धनंजय मुंडे यांचें गुंड धमकी देत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. तसेच धनंजय मुंडे माझ्यावर हजार केसेस कर मी मागे हटणार नाही. माझ्या विरोधात शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर, तरी मी मागे हटत नाही. पण आता मी तुला सोडणार नाही. आता 25 नंतर कायदेशीर भेटू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसी आसरा घेतोयस. खून करणार तुम्ही पापं करणार आणि ओबीसी पांघरून घालणार, असा टोला जरांगेनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. धनंजय मुंडे तुमचे पाय खोलात जात आहे. तुम्ही तुमच्या लाभार्थी टोळीला सांगून आरोपीला साथ देत आहात. तुमच्या कुटुंबाला कोणी मारल तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का ? असाही सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला.