धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी; NCPच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड

बीड- विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड होताच बीडच्या परळी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत निवडीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान धनंजय मुंडे हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील उठावानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. राष्ट्रवादीत दोन गट पडले एक राष्ट्रवादी अजित पवार गट तर दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गट, या सर्व घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून अजित पवार यांना साथ दिली. भाजपला पाठिंबा जाहीर करताना अजित पवार यांच्यासोबत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता. दरम्यान त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील – मुंडे
निवडीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल, प्रांताध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती देण्यात आली. याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार. आगामी काळात पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात, शेवटच्या कार्यकर्ता व जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील राहील, असा शब्द यानिमित्ताने देतो.”





