मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनादेखील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये मुंडे यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांचा समावेश होता.
दरम्यान, याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील करोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील करोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण करोनावर मात करुन घरी परतले आहेत.
सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार🙏
हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू. pic.twitter.com/XyG22BSqsD— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 22, 2020