धनंजय महाडिकांनी पाया पडत राजू शेट्टींचे घेतले आशीर्वाद; महाडिकांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक

कोल्हापूर – भाजपचे नवनिर्वाचिक खासदार धनंजय महाडिक यांनी रस्त्यावर गाडी थांबवून पाया पडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाहयरल होत असून महाडिक यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.
धनंजय महाडिक मुंबईहून कोल्हापूरला जात होते. यावेळी कराड येथील पंकज हॉटेल येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटून बाहेर पडत असताना, तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हॉटेलमध्ये निघाले होते. यावेळी पुणे -बेंगलोर महामार्गावर राजू शेट्टी हे गाडीतून खाली उतरताच धनंजय महाडिक हे आपल्या गाडीतून तात्काळ खाली उतरले आणि राजू शेट्टी यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. उपस्थित कार्यकर्त्यांनी या प्रसंगाचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाडिक यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातला उमेदवार निवडून आल्याने आनंद आहे. धनंजय हे आमचे मित्र आहेत. सध्या आम्ही भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांच्यापासून लांब आहोत, स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याने आनंद होत आहे. दरम्यान आज धनंजय महाडिक यांची कोल्हापुरात विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचे मोठे आयोजन केले आहे.





