कोल्हापूर : लाडक्या बहिणींविषयी भरसभेत केलेले वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका सुरु केली आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तरीही धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे.
काय लिहिले नोटिसीमध्ये ?
जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
काय म्हणाले होते धनंजय महाडिक?
लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा, त्यांची व्यवस्था आम्ही करू, असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होतं.