बीड : मागच्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संतापाची लाट आहे. एकीकडे हे व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे मृत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचेदेखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये दादा खिंडकर तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एका गाडीची तोडफोड करताना दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे. ज्यात दादासाहेब खिंडकर याचा समावेश आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण आपापसात मिटवण्यात आले होते. यानंतर सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी दादा खिंडकर घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तसेच त्याच्यावर नागपूर येथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दादा खिंडकर नेमका आहे तरी कोण? याबद्दल जाणून घेऊया… कोण आहे दादा खिंडकर? बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच दादासाहेब खिंडकर आहे. धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता. दादासाहेब खिंडकर याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या दहा वर्षापासून तो राजकारणात सक्रिय आहे. राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांचे मागच्या १० वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडण समोर आले होती.