वेळापुरात भक्तीचा मेळा; माऊलींच्या समाज आरतीला वैष्णवांची गर्दी

वेळापूर – पानीवपाटीच्या शिवारात रंगलेले गोल रिंगण, विठ्ठल भेटीसाठी केलेला धावा व लोकरंजनातून भक्तीमार्ग सोपा करणारे भारूड असे विविध रंग उधळीत आषाढी वारीने पंढरीस निघालेला विठ्ठल भक्तीचा आनंद मेळा रविवारी श्री अर्धनारी नटेश्वर व डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यपावन अशा वेळापूर नगरीत रविवारी (दि. 24) विसावला.
सोमवारी (दि. 25) सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेवून संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी 6.30 वाजता माळशिरसहून मार्गस्थ झाला. सोहळा दुसऱ्या गोल रिंगणासाठी सकाळी 8.30 वाजता पानीवपाटी येथे पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदार राजाभाऊ यांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरूवात झाली. सकाळी 9.30 वाजता माऊलींचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला.
लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा भाविकांनी अनुभवला. त्यानंतर वारकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. खुडूस ग्रामस्थांचे भक्तीपूर्ण स्वागत स्विकारून श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा निमगांव मगराचे (पाटी) येथे पोहोचला.
निमगांव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतीच्या वतीने येथे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वेळापूर येथे प.पू.डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस ऊर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्विकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्यावतीने माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही स्वागत केले.
…अन् वैष्णव पंढरीच्या दिशेने धावले
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. “तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ हा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून वारकरी येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करत असत. पण यंदा रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने उतारावरुन सायंकाळी 4 वाजता चोपदारांनी अश्वानंतर एक एक दिंडी सोडली. त्यावेळी माऊली। माऊली।। नामाचा जयघोष करीत अबालवृद्ध वैष्णव पंढरी समीप आल्याने पंढरीच्या दिशेने धावत गेले.





