satara | प्रति पंढरपूर करहरमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये

कुडाळ, (प्रतिनिधी) – जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी यात्रा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने मुदतीत पूर्ण करावीत.
यावर्षी मोठ्या संख्येने भाविक प्रती पंढरपूर करहरमध्ये विठ्ठल दर्शनास येणार आहेत. त्यामुळे उत्सव समितीसह प्रशासनाने, तसेच प्रत्येक विभागाने योग्य त्या दक्षता घेवून उत्सव सोहळा चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल या दृष्टीने व्यवस्था ठेवावी, असे आवाहन सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी यात्रा नियोजनाबाबत आयोजित केलेल्या बैठकीवेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार हणमंत कोळेकर, माजी उपसभापती हणमंतराव पाटें, प्रमोद शिंदे, समाधान पोफळे, नितीन गावडे,
अरुण यादव, संदिप परामणे, गट विकास अधिकारी मनोज भोसले, सपोनि संतोष तासगावकर, पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकामसह सर्व विभागांचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी, उत्सव समिती व सांप्रदायिक मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भाविकांना रांगेतून दर्शन घेताना मंडपाची उभारणी करावी तसेच दिंडी सोहळ्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने सामाजिक संदेशपर चित्ररथ काढून मिरवणुक काढावी अशा सुचना दिल्या. भाविकांसाठी आरोग्यसेवा, स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे चिखल होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरूम टाकणे आदी निर्णय घेण्यात आले.
बैठकीमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, आदी विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. नितिन गावडे यांनी उपस्थिांचे स्वागत केले. तर यात्रा समीतीच्या वतीने आभार मानन्यात आले.





