भाविकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्यांमधून कमावले 1 कोटी रूपये

जोशीमठ : उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू झाली असून देशाच्या विविध भागांतून भाविक राज्यात दाखल होत आहेत. राज्यात गर्दी वाढत चालली असल्यामुळे तेथील पहाडी भागातील प्लॅस्टिकचा कचराही वाढतो आहे. मात्र जोशीमठ नगरपालिकेने या कचऱ्यातही संधी शोधली असून त्याला आपले उत्पन्नाचे साधन बनवले आहे. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यातील प्लॅस्टिक बाटल्यांचे रिसायकलींग करून नगरपालिकेने १ कोटी रूपये कमवले आहेत.
चार धाम यात्रेमुळे वाढलेल्या गर्दीत उत्तराखंडमध्ये वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या कोंडीचाही प्लॅस्टिकचा कचरा वाढण्यास हातभार लागत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जी बाब डोकेदुखीची ठरत होती त्यालाच आता उत्पन्नाचे साधन बनवण्यात आले आहे. जोशीमठ नगर पालिका प्रशासनाने ३ टनपेक्षा जास्त प्लॅस्टिक कचरा गोळा केला होता व तो रिसायकलसाठी पाठवण्यात आला.
बद्रनाथ, हेमकुंड साहेब आणि फुलोंकी घाटी या यात्रामार्गातील जोशीमठ हे सगळ्यांत प्रमुख थांबण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी सगळ्यांत अधिक असते. पालिकेने पाण्याच्या, शीतपेयांच्या तब्बल अडीच लाख टाकून दिलेल्या बाटल्या एकत्रित केल्या होत्या. कॉम्पॅक्टर मशिनने ब्लॉक करून त्याचे रिसायकल केले जाते आहे. यात्रामार्गावर ठिकठिकाणी सफाई मित्र आणि पर्यावरण मित्र तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम अत्यंत योग्य समन्वयाने सुरू आहे.





