Devkhel Web Series : झी 5 या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 जानेवारी 2026 रोजी रिलीज झालेली मराठी वेबसीरीज ‘देवखेळ’ (Devkhel Web Series) रिलीज होताच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलर वेबसीरीज (Devkhel Web Series) रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील लोककथा आणि शिमगा (होळी) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, स्थानिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष दाखवते. मात्र, गुहागर परिसरातील नागरिक आणि भाविकांनी वेबसीरीजच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये शंकासुर देव यांच्या चित्रणाबाबत गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून टीझर आणि ट्रेलर काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शंकासुर देव हे गुहागर आणि परिसरातील प्राचीन आणि श्रद्धास्थान मानले जाते. शिमगोत्सव काळात हजारो भाविक येथे श्रद्धेने दर्शन घेतात आणि उपासना करतात. मात्र, ‘देवखेळ’ च्या टीझर आणि ट्रेलरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Devkhel Web Series विशेषतः “शंकासुर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे” अशा संवादांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात ‘आपलं गुहागर’ या सामाजिक संस्थेने सक्रिय भूमिका घेतली आहे. संस्थेच्या वतीने ॲड. संकेत अरुण साळवी (प्रेसिडेंट, गुहागर बार असोसिएशन आणि ‘आपलं गुहागर’चे समन्वयक) यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, Zee5 च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर २१ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या ट्रेलरला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने हा आक्षेपार्ह मजकूर देशभरात प्रसारित झाला आहे. यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. काही स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावरून टीझर-ट्रेलर डिलिट न केल्यास कार्यालय फोडण्याचा थेट इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. ही वेबसीरीज शंकासुर या लोककथेवर आधारित असून, दरवर्षी होळी पौर्णिमेला कोणीतरी मरते आणि गावकरी हे शंकासुराच्या दैवी शिक्षेचे रूप मानतात, अशी कथा आहे. मात्र, भाविकांचा दावा आहे की हे चित्रण श्रद्धेवर आघात करणारे आहे. दरम्यान, ‘देवखेळ’ ही मराठी ZEE5 ची मूळ मालिका असून, ती रत्नागिरी जिल्ह्यातील देवतली या काल्पनिक गावात घडते. निर्देशक चंद्रकांत लता गायकवाड यांनी या मालिकेत लोकपरंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. रिलीज होताच वेबसीरीज सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली असून, एकीकडे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच दुसरीकडे धार्मिक भावना दुखावल्याचा वाद निर्माण झाला आहे. Zee5 किंवा निर्मात्यांकडून अद्याप या तक्रारीबाबत अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे पण वाचा : Share Market: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार घसरला; टाटा स्टीलला सर्वात जास्त फटका