Devendra Fadnavis : जैन तत्त्वज्ञानातील विचार मानवतेसाठी दिशादर्शक; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले मत
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, दीक्षेचा विचार करणे, दीक्षा घेणे आणि आयुष्यभर त्या व्रताचे पालन करणे या तिन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. मात्र, त्याग आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून जीवनाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य जैन धर्मात आहे.

Devendra Fadnavis : जैन धर्माने केवळ मानवाचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या जगण्याचा आणि संरक्षणाचा विचार केला आहे. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आत्मसंयम आणि जीवदया ही जैन तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये असून, त्यातून मानवतेच्या कल्याणाचा व्यापक विचार मांडला आहे.
समर्थ तोच टिकेल असे पाश्चात्य विचारधारा सांगते, मात्र भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते आणि त्याच्या जगण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी समाजावर टाकते. जैन धर्माने या विचाराला आणखी व्यापक स्वरूप दिले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित जैन दीक्षा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. फडणवीस यांनी प्रथम दीक्षा स्वीकारणाऱ्या दीक्षार्थींचे अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, दीक्षेचा विचार करणे, दीक्षा घेणे आणि आयुष्यभर त्या व्रताचे पालन करणे या तिन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. मात्र, त्याग आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून जीवनाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य जैन धर्मात आहे. जैन तीर्थंकरांनी दिलेला विचार हा केवळ एका व्यक्तीच्या कल्याणापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा आहे.
परमपूज्य नम्रमुनी महाराज यांनी लाखो लोकांच्या जीवनाला आपल्या विचारांचा स्पर्श करून त्यांना अहिंसा, जीवदया आणि भूतदयेच्या मार्गावर आणले आहे. करुणा केवळ विचारांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची शिकवण त्यांनी दिली.
तसेच, दुष्काळाच्या या संकटकाळात समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढे यावे. केवळ करुणा, जीवदया आणि मानवतेचे विचार मांडून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची हीच वेळ असून दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अनंत अंबानी खऱ्या अर्थाने करुणादूत
अनंत अंबानी यांना करुणादूत पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नम्रमुनी महाराज यांचे आभार मानताना फडणवीस म्हणाले, अनंत अंबानी यांची प्राणिमात्रांविषयीची करुणा विलक्षण आहे. माणसांप्रमाणेच प्राणी-पक्षी हेही त्यांचे मित्र आहेत. प्राणिमात्रांप्रति असलेली ही संवेदना त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अनंत अंबानी यांनी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी भूतदयेचे कार्य एका व्यापक मिशनमध्ये रूपांतरित केले आहे. वनतारा हा त्यातून साकारलेला अत्यंत उल्लेखनीय प्रकल्प असल्याचे ते (Devendra Fadnavis) म्हणाले.






