Devendra Fadnavis : ‘वॉर रूम’चा मास्टरमाईंड मैदानात; फडणवीसांनी सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र शासनाने गुंतवणूक आणि धोरणात्मक निर्णयांना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौस्तुभ धवसे यांची “मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण” या नवनिर्मित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कौस्तुभ धवसे 2014 पासून मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि सहसचिव म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी पायाभूत सुविधा, डिजिटल प्रकल्प आणि गुंतवणूक धोरणांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. प्रशासनाबाहेरील व्यावसायिक म्हणून त्यांचे योगदान नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे.
‘वॉर रूम’ संकल्पनेचा पाया
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात धवसे यांनी ‘वॉर रूम’ ही संकल्पना मांडली होती. या यंत्रणेद्वारे 1.8 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना गती मिळाली. आता या वॉर रूमच्या समन्वयाची आणि पुढील वाटचालीची जबाबदारी धवसे यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आली आहे.
शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी
मुंबईच्या अंधेरीत वाढलेले धवसे यांनी डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतले आणि एस.पी. जैन संस्थेतून व्यवस्थापन पदविका (PGDM) मिळवली. त्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून त्यांनी पब्लिक पॉलिसीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांची ही शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून नेहमीच प्रकट होते.
नव्या भूमिकेतील अपेक्षा
महाराष्ट्राला थेट विदेशी गुंतवणुकीचे (FDI) अग्रगण्य केंद्र बनवणे
फिनटेक, डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर्स, लॉजिस्टिक्स आणि AI क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणुकीला प्रोत्साहन
जागतिक भागीदारी आणि नवतंत्रज्ञान धोरणांची प्रभावी अंमलबजावणी
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही नियुक्ती राज्याच्या दूरदृष्टीपूर्ण धोरण आणि प्रगतीसाठी निर्णायक ठरेल. धवसे यांच्या अनुभव आणि दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे.





