Devendra Fadnavis – छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेला मार्ग हाच राज्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली महाराजांची ४००वी जयंती जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर केले. ३९६ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांनी ५० प्रकारचे जुने कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली आणली आणि जलदुर्गांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा भक्कम केली. शिवरायांचे १२ किल्ले आता जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून, राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक पाळणा गाऊन आणि पोलीस पथकाची मानवंदना देऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन, डॉ. विनोद हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, शिवाजी खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना ‘शिवनेर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार शरद सोनवणे यांनी दाऱ्याघाट आराखडा, कुंभमेळा निधी आणि पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. “महाराजांचे सुशासन आजही प्रेरणादायी आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन वेगाने करून शिवरायांच्या विचारावर आधारित स्वाभिमानी महाराष्ट्र घडवू. लाडकी बहीण योजनेतून स्त्रीसन्मानाची परंपरा आम्ही पुढे जपत आहोत.” – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री “स्व. अजित पवार यांच्या पुढाकाराने शिवनेरी विकास आराखडा साकारला. जुन्नरला पर्यटन तालुका बनवण्याचा आमचा संकल्प आहे. रायगड, वढू बुद्रुक आणि आग्र्यातील शिवस्मारकांच्या कामातून भावी पिढीला राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहील.” – सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री