Devendra Fadnavis – पुणे शहराला देशाचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून ओळख मिळत असून, ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतूक व्यवस्था, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. शहरात हाती घेतलेले प्रकल्प पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण झाल्यानंतर देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करणार असल्याचेही ते म्हणाले. मोहंमदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या नऊ साठवण टाक्यांचे लोकार्पण, तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाण पुलाचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर मंजुषा नागपुरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर, तसेच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम उपस्थित होते. पुण्याचा नवीन विमानतळ, नवीन रिंग रोड, हडपसरपासून यवतपर्यंत आधुनिक प्रकारचा उन्नत मार्ग आदी सर्व माध्यमातून पुण्याची जोडणी चांगली करण्याचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले. महात्मा फुले चौक ते खराडी हा मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील १५ ते २० वाचणार आहेत. रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे येत्या सहा महिन्यांत भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल, असेही फडणवीस म्हणाले. महापौर नागपुरे यांनी प्रास्ताविक केले. टिळेकर यांचेही भाषण झाले. या वेळी पुणे प्रथम या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. सुनेत्रा पवार म्हणाल्या… – छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प स्वराष्ट्राचा अभिमान जागृत करेल. – आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – स्व.अजित पवार यांच्या भूमिकेनुसार विकासकामे करण्यावर भर देऊ