Devendra Fadnavis on Dhas-Munde Meeting | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली. या प्रकरणावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार धनंजय मुंडेवर देखील जोरदार निशाणा साधला. सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवत होते. अशातच, अचानक या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीवरून विरोधकांकडून धस यांच्यावर टीका केली जात आहे. आता धस-मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण कुणाला भेटलं यावरुन यावरून होणारे राजकारण लोकशाहीत योग्य नाही. लोकशाहीत संवाद हा सुरु राहायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेच्या भेटीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुरेश धस यांनी मस्साजोगच्या प्रकरणात खंबीर भूमिका घेतलेली आहे. त्यांची भूमिका सर्वांनी पाहिली आहे. अशा प्रकारे खंबीर भूमिका घेत असताना कोणाशी संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. कारण धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितले आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी धस-मुंडे भेटीवर दिली आहे. दरम्यान, धस-मुंडे भेटीनंतर आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली, गोड बोलून तुम्ही मराठ्यांचे मुंडके मोडून टाकले’, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मुंडेसोबत झालेल्या भेटीबाबत आमदार सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबतच राहील. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे धस म्हणाले.