Devendra Fadnavis : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण ! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडले लोकार्पण

नाशिक : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला.
लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला. आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काही काळजी करू नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली असून तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत.” अशी मिश्किल टिपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बोलताना केली.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचे लोकार्पण केले. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे. एमएसआरडीसीने ५५ हजार कोटी रुपये खर्च करून हा ७०९ किमी लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे.
नियमांचे पालन केले…
इगतपुरी ते आमणे या मार्गावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टेस्ट ड्राईव्ह घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस कसे गाडी चालवतात याचा किस्सा सांगितला. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी गाडीचे सारथ्य केले. येताना देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केले. फडणवीस गाडी चालवणार म्हटल्यावर आपण एलसी घेवूयात असा सल्ला दिला. फडणवीसांनी स्टेयरिंगवर बसताच गाडीने १०० चा स्पीड घेतला. मग थोड्यावेळाने गाडी १२० च्या वेगाने धावत होती. टनेल सुरू झाल्यावर १०० स्पीडवर गाडी आली, कारण टनेलमध्ये १०० स्पीडचा नियम होता. असे नियमांचे पालन करत अतिशय सुरक्षित येथे पोहोचलो, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.





