Devendra Fadnavis | Harshvardhan Sapkal – देवेंद्र फडणवीस हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत, तर प्रत्यक्ष निर्णय दिल्लीतील नेतृत्वाकडून घेतले जातात. अमित शहा हेच राज्याचे मूळ मुख्यमंत्री आहेत, असा निशाणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, हे लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत, पण त्यांच्या विचारांत जमिन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच महायुतीत गटबाजीचे युद्ध सुरू आहे. दिल्लीत जाऊन शिंदे अमित शहांना भेटले, कारण खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत आणि देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व कारभार दिल्लीतून चालतो. एखादा मंत्री नेमायचा असला तरी अमित शहांचा शब्द अंतिम असतो. अगदी किरकोळ तक्रारीसुद्धा दिल्लीपर्यंत पोहोचवाव्या लागतात. हे सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीच्या आदेशावर चालत आहे, असे म्हणत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. नागपूर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत विचारले असता हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. “माध्यमांतून मला तशी बातमी मिळाली आहे, पण आतापर्यंत माझ्याकडे कोणताही राजीनामा किंवा लेखी तक्रार आलेली नाही,” असे ते म्हणाले. तसेच, महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आमची भूमिका ठाम असून इंडिया आघाडीच्या बाहेर युती करायची असल्यास स्थानिक नेत्यांनी प्रस्ताव सादर करावा, नाहीतर आम्ही एकटे लढू,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याशी सतत समन्वय राहील. कालही आमचे नेते त्यांना भेटले. नगरपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची समन्वय बैठक झाली असून आजही चर्चा होईल.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.