Maharashtra CM । Devendra Fadnavis : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. परंतु पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागावी, अशी शिवसैनिकांकडून मागणी केली जात आहे. असं असतानाच मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य दावेदार मानले जात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाष्य केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांना, “मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात चर्चा सुरु आहे,” असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी, “या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून लवकरच निर्णय घेतली. आमचे पक्ष श्रेष्ठी लवकरच याबद्दल निर्णय घेतील. याचं उत्तर लवकरच आपल्याला मिळेल,” असं म्हटलं आहे. फडणवीसांना पुढील प्रश्न मंत्री कोण होणार यासंदर्भात विचारण्यात आला. या प्रश्नावर फडणवीसांनी हसतच, “आधी मुख्यमंत्री ठरेल. मग मंत्री ठरवतील. मला वाटतं मुख्यमंत्र्यांची वाट पहावी त्यानंतर मंत्र्यांची पण नावं लक्षात येतील,” असं त्यांनी यावेळी सांगितलं. कुणाला किती जागा मिळाल्या : लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी पलटवली आहे. महायुतीला प्रचंड यश मिळाले असून महाविकास आघाडीची धूळधाण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपने 145 जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.