Devendra Fadnavis : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर; म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणि पत्रकारांशी बोलताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रकल्पांबाबत माहिती दिली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणि पत्रकारांशी बोलताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रकल्पांबाबत माहिती दिली. यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाला गती देणे, जलसंपदा विभागासाठी नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज आणि सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीबाबतचे मत व्यक्त केले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मोठी चालना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. निधी उभारण्यासाठीही मंजुरी मिळाली असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. ९६ टक्के लोकांनी याला मान्यता दिलेली आहे. लवकरच जमीन अधिग्रहण पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, साधारण १ जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
याशिवाय, एमएमआरडीएला अटल सेतूच्या जवळ प्लानिंग ऑथॉरिटी म्हणून दिलेल्या जागेसाठी सीडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करून जमीन अधिग्रहण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ‘तिसऱ्या मुंबई’च्या संकल्पनेला मोठी चालना मिळेल आणि काम वेगाने होईल, असे फडणवीस म्हणाले.
जलसंपदा विभागासाठी ऐतिहासिक निर्णय
मंत्रिमंडळात जलसंपदा विभागाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ४० प्रकल्प आणि १०० कालव्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प पुढील एक-दोन वर्षांत पूर्ण होऊ शकतात.
अंतिम टप्प्यातील काम बाकी असले तरी, या प्रकल्पांमुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल आणि एकूण आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. राज्यातील सर्व अपूर्ण प्रकल्प यात समाविष्ट करण्यात आले असून, सर्व रिजनला याचा फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आज सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली. दुखवट्यामुळे फक्त शब्दसुमनाने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली वाटचाल करेल. कालच्या निवडणुकीत (जिल्हा परिषद) त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला, असे ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी संयमित उत्तर दिले. “विलिनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा आहे. मी त्यात बोलणे योग्य राहणार नाही. जेव्हा वेळ येईल आणि ते अधिकृतरित्या सांगतील, तेव्हा मी प्रतिक्रिया देईन. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे?” असे ते म्हणाले.
या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे. पुरंदर विमानतळ आणि सिंचन प्रकल्प हे पुणे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरतील.






