Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, अजित पवार यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या तिजोरीची चावी आता मुख्यमंत्र्यांच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आगामी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल, मात्र अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांना पूर्वानुभव आहे. मार्च २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी आली आहे. अजित पवारांच्या जाण्यामुळे राज्याच्या अर्थशाखेचे नियोजन विस्कळीत झाले आहे. दादांनी आजवर ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. यावर्षी ते आपला १२ वा अर्थसंकल्प सादर करणार होते, मात्र नियतीने त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक १३ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे, ज्यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचण्याची अजित पवारांना संधी होती. अजित पवार राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासावर नजर टाकल्यास, जयंत पाटील यांनी १० वेळा, तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. याव्यतिरिक्त रामराव आदिक यांनी ८, मधुकरराव चौधरी यांनी ५ आणि यशवंतराव मोहिते यांनी ४ वेळा अर्थसंकल्पीय भाषणे केली आहेत. युती सरकारच्या काळात एकनाथ खडसे यांनी ३ वेळा तर महादेव शिवणकर यांनी २ वेळा अर्थसंकल्प मांडला होता.