Devendra Fadnavis : बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा स्वाभिमान पुनरुज्जीवित केला; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत
स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा स्वाभिमान पुनरुज्जीवित करण्याचे काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

Devendra Fadnavis : अनेक पिढ्यांना शिकवल्या गेलेल्या इतिहासात आदिवासी नायकांना स्थान दिले गेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नायकांचे योगदान पुन्हा समाजासमोर आणले. स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा स्वाभिमान पुनरुज्जीवित करण्याचे काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.
गडचिरोली जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी फडणवीस बोलत होते. हा कार्यक्रम आदिवासींचे महानायक बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आणि जनजातीय गौरव दिवस निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा आता माओवादापासून मुक्त झाला असून, तो देशातील पुढील स्टील सिटी म्हणून विकसित होत आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि वसाहतवादविरोधी लढा देणारे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात दरवर्षी जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते. भारताच्या इतिहासात या नायकांच्या योगदानाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले होते.
यावर्षीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे यजमानपद गडचिरोलीला दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. आदिवासी समुदायांचा इतिहास गौरवशाली असून त्यांची संस्कृती समृद्ध आहे. परकीय आक्रमणांविरुद्ध लढा देण्यात आणि देशाचे रक्षण करण्यात आदिवासी समाज नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मात्र, पिढ्यानपिढ्या शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात त्यांच्या योगदानाचे योग्य प्रतिबिंब उमटले नव्हते.
जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी या आदिवासी नायकांचे योगदान पुन्हा एकदा समाज आणि विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. तात्या मामा भिल, राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांसारख्या आदिवासी नायकांचा उल्लेख करत ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या पुढाकारामुळे इतिहासातील विसरलेले अध्याय पुन्हा जिवंत होण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
गडचिरोली माओवादापासून मुक्त
मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या पीएम जनमन आणि धरती आबा योजनांचेही कौतुक केले. या योजना आदिवासी गावांपर्यंत आणि विशेषतः अत्यंत असुरक्षित आदिवासी गटांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारनेही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, वसतिगृह सुविधा आणि परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासारखे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
अनेक वर्षे नक्षलवादी हिंसाचाराचा सामना करणारा गडचिरोली जिल्हा, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आता पूर्णपणे माओवादापासून मुक्त झाला आहे. गडचिरोली हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे इंजिन ठरणार आहे. या जिल्ह्याचे रूपांतर होताना त्यात आदिवासी समुदाय, इतर मागास वर्ग आणि आदिवासी मुलींना केंद्रस्थानी ठेवले जाईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधोरेखित केले.






