गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर विविध प्रकारच्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत असल्याने एखाद्या चित्रपटाला किंवा नाटकाला लाजवतील असे प्रसंगही महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये नेते आणि कार्यकर्ते पळवापळवी नाटक रंगले आहे त्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उद्भवणे साहजिक आहे. याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून आपली नाराजी नोंदवली. भाजपाने गेल्या काही दिवसांपासून इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचा परिणाम म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये नाराजीचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच ह्या नेत्यांनी ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. आगामी कालावधीमध्ये कोणत्याही घटक पक्षाने एकमेकांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी करू नये अशा प्रकारचा एक निर्णय झाल्याचेही समोर आले आहे. अर्थात हा निर्णय होत असतानाच छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये समावेश होत होता. ठाकरे सेनेतून भाजपामध्ये आलेले हे नेते शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आव्हान ठरणार आहेत असेच दिसत आहे. जरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे एकमेकांच्या पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी करायची नाही हे ठरले असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील काही नेते आणि कार्यकर्त्यांना जर भाजपामध्ये स्थान दिले तर त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनाच वेगळ्या प्रकारचे आव्हान निर्माण होणार आहे याकडेसुद्धा डोळेझाक करून चालणार नाही. मुळात इतर राजकीय पक्ष कमकुवत करण्यासाठी त्या पक्षांमधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षांमध्ये स्थान देणे ही भाजपक्षाची दीर्घकाळ रणनीती राहिली आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईच्या दौर्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आता भारतीय जनता पक्षाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही अशी घोषणा केली होती. शत प्रतिशत भाजप हा भाजपाचा नारा आहे. भाजपासोबत जे पक्ष युती करतात त्यांचे अस्तित्व हळूहळू संपत जाते असाच इतिहास आतापर्यंत आहे. भाजपाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोचणे शक्य असल्याने इतर सर्वच राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांना या पक्षाबाबतही आकर्षण आहे. इतर पक्षातून आलेल्या अनेक प्रमुख नेत्यांना भाजपाने मंत्रिपदावर किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर बसवले आहे. म्हणूनच भाजपामधील इन्कमिंग सर्वात जास्त आहे. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्येसुद्धा असेच वर्चस्वाचे वाद आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले हे दोन पक्ष विरोधी पक्षांप्रमाणेच एकमेकांशी वागत असतात हेसुद्धा अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीतील घटक पक्षांमधील ही नाराजी जास्त तीव्रतेने समोर येताना दिसत आहे. कारण महायुतीच्या तीन घटक पक्षांनी शक्यतो एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व समीकरणे बदलून गेली आहेत आणि लवकरच होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या काळातही अशाच प्रकारे नवनवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे. कोणतीही निवडणूक असो ती अत्यंत गांभीर्याने घेऊन एखादी रणनीती आखूनच या निवडणुकीमध्ये उतरण्याची भूमिका भाजपातर्फे नेहमीच घेतली जाते. आपला पक्षच नेहमी सर्वात मोठा असावा याच एक कलमी कार्यक्रमावर भाजपची रणनीती ठरलेली असते. अशावेळी आपले मित्र पक्ष नाराज झाले तरी भाजप फारशी फिकीर करत नाही. याच रणनीतीच्या धोरणामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी नाट्य उद्भवले आहे. अशा प्रकारची नाराजी अधिक तीव्र होऊ नये म्हणून पळवापळवीची भूमिका थांबवून कोणत्याही पक्षाने इतर मित्र पक्षांवरील नेते कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊ नये अशा प्रकारचा करार जरी या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये झाला असला तरी तो प्रत्यक्षात येईल की नाही याबाबत मात्र शंका घेण्यास वाव आहे. या एका कारणामुळे मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातला हे मुख्यमंत्री फडणवीस यांना आवडलेले नाही हे त्यांच्या देहबोलीवरूनही लक्षात आले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी हे कृत्य आपणहून केले असेल असेही नाही. एकनाथ शिंदे यांना कल्पना देऊनच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला असावा हे उघड आहे. या निमित्ताने आपली नाराजी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली असली तरी त्याचा नक्की परिणाम काय होतो हे आगामी कालावधीमध्ये कळेल. सध्या तरी अशी ही पळवापळवी या नाटकामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असून त्याचे रूपांतर मनभेदामध्ये होणार नाही याची दक्षता सर्वच घटक पक्षांना घ्यावी लागेल.