Devendra Fadanvis : त्यांनी भाजपच्या नितीनियमाप्रमाणे वागणे अपेक्षित; मुख्यमंत्र्यांकडून बडगुजरांची पाठराखण

नाशिक : उद्धवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुधाकर बडगुजरांमुळे विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. बडगुजरांच्या प्रवेशासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध होता. त्या विरोधाला डावलून त्यांचा पक्षप्रवेश करुन घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उडविल्यानंतर टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मैदानात उतरावे लागले आहे.
पूर्वी भाजपने बडगुजरांवर टीका केली हे खरे आहे. परंतु, त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला, त्यात चौकशीअंती कोणतीही कारवाई झाली नसून ते निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेनेत असतानाच त्यांना ‘क्लीनचिट’ मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आता इतिहास आणि जुनी वागण्याची पद्धत बाजूला ठेवून भाजपच्या नीतिनियमाप्रमाणे वागले पाहिजे, असे म्हणताना देवेंद्र फडणवीसांनी बडगुजरांची पाठराखण करताना भाजपच्या नियमाप्रमाणे वागण्याचा सल्ला देखील दिला.
बडगुजरांच्या प्रवेशानंतर त्यांचे समर्थन करताना भाजपच्या नेत्यांना नाकीनऊ आले आहेत. बडगुजरांना प्रवेश देण्यासाठी भाजपमध्ये अंतर्गत विरोध देखील होता. मात्र, पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून त्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बडगुजर यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली होती. त्यांचा एक व्हिडीओदेखील नितेश राणे यांनी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या चौकशीअंती त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
त्यांनी भरपूर मते घेतली आहेत…
बडगुजर उद्धवसेनेत उपनेते होते. त्यांनी आमच्या विरोधात विधानसभा देखील लढवली आहे. ते विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी भाजपमध्ये सहभागी होण्याची इच्छा दाखवली होती. त्यांनी विधानसभेला चांगली ताकद दाखवताना, मते देखील घेतली होती. त्यामुळे आमच्या पक्षात असे कुणी येणार असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे म्हणत फडणवीसांनी पुन्हा बडगुजरांची पाठराखण केली.





