कराड जिल्ह्याच्या दृष्टीने विकासकामे केली

कराड – मी राज्याचा मुख्यमंत्री असताना कराडसाठी हजारो कोटींचा निधी दिला. त्यामध्यामातून कराडला विविध प्रशासकीय कार्यालये, बस स्थानक, आरटीओ कार्यालय, रस्ते, विश्रामगृह आदी. मोठी कामे झाली. नवीन कराड जिल्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी बहुतांश शासकीय कामे मार्गी लावली असून सर्वार्थाने कराडचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच भविष्याच्या दृष्टीने आणखीही काही कामे होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कराड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी दि. 23 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, फारुख पटवेकर, काटकर सर, इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, भानूदास माळी, झाकीर पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, मुंबई येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पुनर्गठन करण्यात आलेल्या उच्चाधिकारी समितीची सोमवारी बैठक पार पडली. यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराडच्या प्रशासकीय कामांच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. शुक्रवार दि. 25 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते कराडला येणार असून त्यादिवशी दुपारी 12 वाजता कराड दक्षिणमध्ये झालेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, तसेच नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली आणि रेठरे बुद्रुक येथील नवीन पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, कराड हे सर्वार्थाने मध्यावर्ती व महत्त्वपूर्ण ठिकाण असून याठिकाणी रेल्वे स्टेशन, आशियाई महामार्ग, तसेच विमानतळ यासारख्या महत्त्वपूर्ण सुविधा आहेत. त्याचबरोबर कृषी व औद्योगिक प्रगतीसाठी याठिकाणी पाण्याचीही मोठी उपलब्धता असून येथे असलेल्या शैक्षणिक व आरोग्य सुविधाही वाढवणे आवश्यक आहे. एकंदरीतच कराडला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून शहराच्या विकासासाठी आणखीन प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आमचे सरकार असते तर…
कराडचा झपाट्याने विकास होत आहे. नवीन कराड जिल्हयाच्या दृष्टीने येथे आणखीही काही प्रशासकीय व अन्य कामे होणे आवश्यक आहे. युवकांना येथेच रोजगार मिळावा, यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे असून आमचे सरकार असते तर; त्याला आणखीनच चालना मिळाली असती, असेही मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करावे
कराड शहरातील वाढीव भागासाठी दिलेला निधी, त्यातून झालेली कामे आणि तेथील समस्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, शहरातील वाखाण भागातील जवळपास 60 टक्के भाग कराड शहराशी जोडला आहे. वाढीव भागाच्या विकासासाठीही मी निधी दिला असून त्या माध्यमातून झालेली कामे आणि त्यांचा दर्जा याबाबत राज्य शासनासह नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहरातील नगरसेवकही त्यासाठी तितकेच तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत शहरातील नागरिकांनीही नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करावे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.





