पुणे : लोकांच्या भावना समजून घेऊनच कस्तुरबा आणि डॉ. आंबेडकर वसाहतीचा विकास करणार असल्याची ग्वाही औंध- बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर ऊर्फ सनी विनायक निम्हण यांनी मतदारांना दिली. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निम्हण यांनी या भागातील मतदारांशी संवाद साधला. या वेळी या भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत लोकभावनेचा आदर ठेवूनच महापालिकेच्या माध्यमातून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या वेळी महायुतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. निम्हण यांच्या प्रचारानिमित्त औंध परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. ही पदयात्रा कस्तुरबा वसाहत, जगदीशनगर, कांबळे वस्ती, संजय गांधी वस्ती, स्पायसर वस्ती या भागात काढण्यात आली होती. या वेळी मतदारांशी संवाद साधताना सनी विनायक निम्हण म्हणाले, झोपडपट्टी भागांचा विकास करताना तिथे एसआरए करायचे किंवा नाही, हे स्थानिक नागरिकांनी ठरवायचे आहे. भाजप हा नेहमी स्थानिक नागरिकांना लोकांच्या भावना समजून घेऊन विकासावर भर देतो. यामुळे वस्ती विभागात सुधारणा, सोयीसुविधा पुरवताना नागरिकांना विचारात घेऊ, असे ते म्हणाले.