इंदापूर : काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात यावेळी विकास हाच केंद्रबिंदू ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीमंत ढोले यांनी दिले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गटाचा सर्वांगीण कायापालट घडवून आणण्याचा ठाम निर्धार त्यांनी जाहीर करत, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विचार-आशीर्वादातून विकासाचा अजेंडा प्रत्यक्षात उतरवण्याची भूमिका स्पष्ट केली. काटी-लाखेवाडी गट हा केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा गट असून या भागाच्या विकासात अजित पवार यांचे योगदान ऐतिहासिक राहिले आहे. रस्ते, वीज, पाणी, सिंचन, शिक्षण व आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांवर अजितदादांनी घेतलेले ठोस निर्णय आजही जनतेच्या स्मरणात आहेत. अजितदादांनी घालून दिलेल्या विकासाच्या पायावरच पुढचा डोलारा उभा राहील, असे स्पष्ट करत श्रीमंत ढोले यांनी भावनिक पण ठाम भूमिका मांडली. या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, वीज खंडित होण्याच्या समस्या आणि रखडलेल्या विकास कामांना कायमचा पूर्णविराम देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सर्व योजना फक्त कागदावर न राहता त्या थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी केली जाईल. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटक यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषद ही प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः शेतकर्यांच्या पाण्याच्या प्रश्नांवर, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा व्यक्तीकेंद्रित नसून विकासकेंद्रित राजकारणाचा आहे. त्यानुसार काटी-लाखेवाडी गटाला विकासाचे मॉडेल म्हणून उभे करण्याचा निर्धार असल्याचे सांगत श्रीमंत ढोले यांनी जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात काम करणारा प्रतिनिधी हवा की केवळ आरोप-प्रत्यारोप करणारा, हा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे, असे सूचक आवाहन करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. विकास, विश्वास आणि सामाजिक जाणिवेच्या जोरावर हा गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. फोटो आहे.