Nepal Disaster: नेपाळमध्ये जलप्रलयाचा कहर! मृतांचा आकडा ४०० वर, २९० भारतीय बेपत्ता; मदतीसाठी हेल्पलाइन जारी
Nepal Disaster काठमांडू येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी +9779851316807, +9779709107500 आणि +9779810326117 या क्रमांकांवर संपर्क करता येईल. याशिवाय +911123088718, +911123088719 आणि +919968291988 (व्हॉट्सॲप) या क्रमांकांवरही मदत आणि माहिती मागता येणार आहे.

Nepal Disaster: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मुसळधार पाऊस, अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा ४०० वर पोहोचला आहे, तर ३० हून अधिक देशांतील १,४०० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. यामध्ये २९० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. मात्र, मृतांमध्ये किती भारतीयांचा समावेश आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमध्ये अडकलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम सुरू केला आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी +9779851316807, +9779709107500 आणि +9779810326117 या क्रमांकांवर संपर्क करता येईल. याशिवाय +911123088718, +911123088719 आणि +919968291988 (व्हॉट्सॲप) या क्रमांकांवरही मदत आणि माहिती मागता येणार आहे.
पुन्हा पुराचा धोका
नेपाळमधील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. भोटेकोशी नदीच्या परिसरात नवीन बॅरियर तलाव तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. या तलावात पाण्याची पातळी वाढत असल्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेपाळमधील परिस्थितीचा परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
काही मिनिटांत उद्ध्वस्त झाली गावं
या पुराची तीव्रता काही प्रत्यक्षदर्शींच्या अनुभवातून समोर येत आहे. काही भागांमध्ये पाण्याचा प्रवाह एवढ्या वेगाने आला की, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधीही मिळाली नाही. नदीच्या पात्रापासून उंच ठिकाणी असलेल्या गावांमध्येही पाणी आणि मलबा शिरला. काही घरं आणि इमारती काही मिनिटांतच उद्ध्वस्त झाल्या.
अनेक कुटुंबीय अजूनही आपल्या नातेवाईकांच्या शोधात आहेत. काठमांडूसह विविध ठिकाणच्या रुग्णालयांबाहेर नागरिक हातात आपल्या बेपत्ता नातेवाईकांचे फोटो, पत्ते आणि मोबाइल क्रमांक असलेले पोस्टर घेऊन उभे आहेत. रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या वाढली असून काही ठिकाणी शवगृहांमध्येही जागा कमी पडत असल्याची माहिती आहे.
Nepal Disaster
पूल आणि रस्त्यांचे मोठे नुकसान
पुरामुळे नेपाळच्या वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक पूल आणि रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. काही भागांमध्ये वाहनं मलब्याखाली अडकली आहेत. रस्ते आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे बचावकार्यालाही अडथळे निर्माण होत आहेत.
भारतीय कुटुंबीयांमध्ये चिंता
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले काही भारतीय नागरिकही संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या सुखरूप परतण्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, प्रशासन आणि बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी नदीकाठच्या आणि धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
नेपाळमधील या भीषण आपत्तीने संपूर्ण देश हादरला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचावकार्य, बेपत्ता नागरिकांचा शोध आणि प्रभावित कुटुंबांना मदत पोहोचवणे याला प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे.




