- भरीव कामगिरीची मिळाली पोचपावती
खालापूर – खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत सध्या नावारूपाला आली असून, ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे राबवून वेगळा आदर्श निर्माण केल्याने शासनाने देवन्हावे ग्रामपंचायतीस 9001 : 2015 हे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तालुक्यात भरीव विकासकामे राबविण्यात येथील लोकप्रतिनिधी सामाजिक भावनेतून नागरिकांनी सुविधा देण्यात यश मिळविली असल्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातून येथील सरपंच अंकित साखरे व सर्व सहकारी वर्गाचे अभिनंदन होत आहे.
देवन्हावे ग्रामपंचायत ही एकेकाळी राजकारणाचे प्रमुख गाव म्हणून चर्चेत होते; मात्र गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी अंकित साखरे यांना येथील मतदारांनी निवडून देत एक हाती सत्ता दिल्याने सहकारी वर्गाला विश्वासात घेत गावात भडसावणाऱ्या समस्या पाणी, गावातील अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायतीचे दप्तर, ग्रामपंचायतीची भव्य इमारत, अंगणवाडी, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा ग्रामपंचायतीने निर्माण करून दिल्या. नंतर आय.एस.ओ. मानांकनासाठी प्रयत्न केले. संबंधित संस्थेच्या अधिकारी वर्गाने याठिकाणी भेट देत सर्वेक्षण केले.
त्यानुसार गुरुवारी ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. मानांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये सरपंच अंकित साखरे, उपसरपंच वृषाली नलावडे, सदस्य भगवान पाटील, संदेश चौधरी, सागर भुर्के, संदीप जाधव, सदस्या स्नेहा कडव, माधुरी पाटील, वासंती गंभीर, राणी पाटील, ग्रामसेवक शाम पवार तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व लोकसहभागातून गावाची प्रगतशील वाटचाल सुरू आहे.
या मानांकन मिळाल्याने गावाचा सन्मान झाला असून, हा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी सरपंच या नात्याने नेहमी प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया सरपंच अंकित साखरे यांनी दिली.