पुणे : जुन्या शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन स्वतंत्र आणि प्रभावी वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता स्थानिक रहिवासी, व्यापारी संघटना आणि प्रशासनाचा समन्वय साधून सदाशिव पेठेतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक २५-ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे उमेदवार कुणाल टिळक यांनी शुक्रवारी सदाशिव पेठ परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबवत स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधला. या संवादात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतूक कोंडीची मुद्दा नागरिकांनी ठळकपणे मांडला. अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव आणि वाढती वाहनसंख्या यामुळे सदाशिव पेठेतील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, याचा फटका विद्यार्थ्यांपासून व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच बसत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार निवेदन देऊनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याची खंतही यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. मात्र, आता महापालिकेच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही कुणाल टिळक यांनी दिली. या निमित्ताने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहणारे नेतृत्व आवश्यक असल्याची भावना या संवादातून व्यक्त होत असून टिळक यांना मतदार सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.