वाघोलीत खड्डे मुक्तीचा निर्धार! संपत गाडे यांचा अभिनव उपक्रम

वाघोली – वाघोली (तालुका हवेली) येथील समाजसेवक संपत आबा गाडे यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेले खड्डे पुणे मनपाच्या मदतीने दूर करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून अनेक ठिकाणचे खड्डे बुजून वाहतूक कोंडीमुक्त परिसर करण्याचा निर्धार गाडे यांनी केला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
समाजसेवक संपत आबा गाडे यांनी सांगितले की, “वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, याचबरोबर पुणे महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्यातून ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवून वाहतूक कोंडी मुक्त परिसर बनवण्याकडे प्रयत्न सुरू असून कायमस्वरूपी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. बकोरी फाटा परिसरातील खड्डे बुजवले जात असून उर्वरित भागातील देखील खड्डे बुजून वाघोलीचा भाग वाहतूक कोंडी मुक्त तसेच खड्डे मुक्त करण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून रात्री अप रात्री देखील युद्ध पातळीवर खड्डे दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.”





