विदेशी नागरीकांसाठी महाराष्ट्रात डिटेंशन सेंटर्स सुरू करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या, व्हिसाची मर्यादा ओलांडणाऱ्या आणि हद्दपारी टाळण्यासाठी किरकोळ गुन्हे करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर्स सुरू करण्यात येतील अशी माहितीे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
ते म्हणाले की, आमच्या लक्षात आले आहे की काही नायजेरियन तसेच इतर परदेशी नागरिक अंमली पदार्थांच्या विक्रीत गुंतलेले आहेत. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून ते येथे जास्त मुक्काम करतात.
अशा उल्लंघनासाठी हद्दपारी होऊ नये म्हणून ते क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये स्वत:हून अडकतात आणि येथे जास्त काळ राहण्याची व्यवस्था करतात. असे प्रकार रोखण्यासाठी या विदेशी नागरीकांसाठी स्वतंत्र डिटेंशन सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जेथे या परदेशी नागरिकांना त्यांच्या हद्दपारीपर्यंत ठेवण्यात येईल. मादकद्रव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही एटीएसला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.





