मुंबई – मागील एक वर्षापासून जागतिक पातळीवर करोना संसर्गाने कहर माजवला आहे. मध्यंतरी करोना संसर्ग अटोक्यात आला असताना आता करोनाने पुन्हा हाहाकार सुरू झाला आहे. विदर्भात करोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. नागपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असून एका दिवसांतील रुग्णसंख्येने दोन हजारचा आकडा पार केला आहे.
मागील 24 तासांत नागपुरात 2261 नवीन रुग्ण आढळून आले असून 07 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नागपुरात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील रुग्णसंख्या दोन हजारच्या पार गेली आहे. सध्या नागपुरात सक्रीय रुग्णांचा आकडा 15 हजार 467 च्या घरात गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे अधिक आहेत.
नागपूर पाठोपाठ पुण्यातही करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यात दिवसभरात 1805 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी ०5 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सक्रीय रुग्णांची पुण्यातील संख्या 9740 वर गेली आहे.