तब्बल 180 क्षेपणास्त्रे डागूनही इस्त्रायलमध्ये केवळ दोन जण जखमी; पूर्वसूचनेमुळे इस्त्रायलने अगोदरच केली होती तयारी

नवी दिल्ली : इराणने मंगळवारी रात्री एकाच वेळी 181 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. पण इराणचा हा हल्ला फसला असल्याचे आता उघड होते आहे. याचे कारण एवढ्या मोठ्या हल्ल्यात इस्रायलचे फारसे नुकसान झाले नाही. राजधानी तेल अवीवमध्ये फक्त दोन जण जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पश्चिम किनारपट्टी भागात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला. काही इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त नाही. इराणच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायलने विशेष योजना तयार केली होती असे म्हटले जाते आहे. या योजनेच्या मदतीने त्यांनी आपल्या देशाला मोठ्या विनाशापासून वाचवले आहे.
तसेच इराणच्या हल्ल्यापूर्वीच अमेरिकेने इस्रायलला सतर्क केले होते. इराण मंगळवारी मोठा हल्ला करू शकतो, अशी माहिती अमेरिकेने इस्रायलला दिली होती. एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा हा हल्ला अधिक प्राणघातक असेल असेही सांगितले होते. अमेरिकेकडून हे इनपुट मिळाल्यानंतर इस्रायलने विनाश टाळण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली. अमेरिकेकडून अलर्ट मिळाल्यानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना सतर्क केले. त्यांना बंकरजवळ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, जेणेकरून हल्ला झाल्यास ते त्वरित बंकरमध्ये आश्रय घेऊ शकतील.
इस्त्रायलच्या लष्कराच्या होम फ्रंट कमांडने बंकरने सुसज्ज नसलेल्या शाळा आणि कार्यालये बंद केली. याशिवाय किनारे बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कोणत्याही मोकळ्या जागेत 30 पेक्षा जास्त लोक आणि इमारतीच्या आत 300 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी होती. मंगळवारी संध्याकाळी, इस्रायलच्या होम फ्रंट कमांडने मध्य इस्रायलमधील गुश डॅनमधील लोकांना ताबडतोब बंकरमध्ये जाण्याचा इशारा दिला. लोकांना पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर न पडण्यास सांगण्यात आले आहे. इराणचा हल्ला थांबल्यानंतर होम फ्रंटने सर्व नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोनवर बंकरमधून बाहेर येण्याचा संदेश दिला.
इराण तेल अवीवमधील तीन लष्करी हवाई तळ आणि गुप्तचर मुख्यालयावर हल्ला करेल अशी सूचनाही अमेरिकेकडून अगोदरच देण्यात आली होती. हल्ल्यापूर्वीच इस्रायलने गुप्तचर विभागाचे मुख्यालय रिकामे केले होते. अगाउ माहितीमुळे केलेल्या पूर्वतयारीमुळेच इस्त्रायल एका मोठ्या संकटातून वाचू शकले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी इराणने अनेक देशांना आपल्या हल्ल्याची वेळ आणि तो किती भयानक असेल याची माहितीही दिली होती. यापूर्वी एप्रिलमध्येही इराणने इस्रायलवर ३०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता. त्यावेळीही इराणने अनेक देशांना आपल्या हल्ल्याची माहिती दिली होती.
इस्रायलने इराणची क्षेपणास्त्रे आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखली. अमेरिकेनेही अनेक क्षेपणास्त्रे पाडण्यात मदत केली. हवाई संरक्षण यंत्रणेने देशाला मोठ्या विनाशापासून वाचवले असल्याचे खुद्द इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले. इराणची क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी इस्रायलने डेव्हिड स्लिंग, ॲरो-2 आणि ॲरो-3 इंटरसेप्टर्सचा वापर केला. डेव्हिडचे स्लिंग हे मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे आणि रॉकेटला हवेत रोखण्यास सक्षम आहे. तर एरो-3 इंटरसेप्टर 2,400 किमी अंतरावरून हवेत डागलेल्या क्षेपणास्त्राला नष्ट करते. मात्र, हवाई संरक्षण यंत्रणाही काही क्षेपणास्त्रांना रोखू शकली नाही.
किती नुकसान झाले?
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. अमेरिका आणि इस्रायल या दोघांनीही हा हल्ला अयशस्वी असल्याचे म्हटले आहे. मात्र, इराणच्या काही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी एअरबेसला लक्ष्य केल्याचे इस्रायली लष्कराने मान्य केले.





