Santosh Deshmukh : देशमुख हत्या प्रकरण! निलंबित पोलिसांसोबत न्यायाधीशांची धुळवड; फोटो व्हायरल

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित आणि रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काही फोटो ‘एक्स’वर शेअर केले आहेत. दमानियांच्या दाव्याने देशमुख यांच्या हत्येच्या सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.
‘एक्स’वर पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकाऱ्यांसोबत केस चालू असताना, न्यायाधीश होळी खेळत असतील, तर हे खूप चुकीचे आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निलंबित राजेश पाटील यांच्यावर आरोपींसोबत संगनमत साधल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पाटील यांच्या चौकशीची मागणी केली जात आहे. आरोपी विष्णू चाटे याच्या कार्यालयातील 29 नोव्हेंबर 2024 मधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात वाल्मिक कराडसह राजेश पाटीलही दिसून येत आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस अगोदर 8 डिसेंबर 2024 रोजी राजेश पाटील यांनी केज येथील एका हॉटेलात आरोपी सुदर्शन घुलेचीही भेट घेतल्याचा आरोप आहे. त्याचेही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचीही या प्रकरणात संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप केला जात आहे.





