पाटणमध्ये देसाई-पाटणकर मैत्रिपर्वाची हवा

सूर्यकांत पाटणकर
पाटण – राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेस असे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. याचा परिणाम पाटण तालुक्याच्या राजकारणावर होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. येथील पंचायत समितीच्या सभेत आघाडीचा धर्म पाळण्याचा नेत्यांचा निरोप सभापतींना आल्याने पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर मैत्रीपर्वाचे वारे वाहणार का? याबाबत जनेतेत उत्सुकता आहे.
पाटण तालुक्याचे राजकारण नेहमीच देसाई-पाटणकर या दोन गटांभोवती फिरत आहे. राजकारणासाठीचा दोन्ही गटांचा संघर्ष तालुक्यातील जनतेने अनेकवेळा अनुभवला आहे. अनेक वेळा विकासाच्या मुद्यावर राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकमेकांचे पुतळे जाळण्याचा प्रकारही तालुक्यात झाला होता. त्यामुळे सध्या दोन्ही गटांचे पक्ष सरकारमध्ये असल्याने तालुक्यात दोन्ही गटातील सत्ता संघर्षाची धार बोथट होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या सभेत सभापती राजाभाऊ शेलार यांनी यावर शिक्कामोर्तब केला.
राज्यात राष्ट्रवादी शिवसेना व कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे पंचायत समितीत ही आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन त्यांनी विरोधी सदस्यांना केले. सध्या आपला भाजपा एकमेव शत्रू आहे. आपल्यातील संघर्ष कमी करून गट-तट वाढवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असा निरोप नेत्यांचा असल्याची कबुली सभागृहात शेलार यांनी दिली आहे.
विकास कामांच्या मुद्द्यावर पंचायत समितीत देसाई-पाटणकर गटाचे सदस्य आमने-सामने आल्याचा प्रसंग अनेक वेळा उद्भवला होता. या ही वेळी सभापती आपल्या दारी या अभियानाच्या नामकरणावरून ना. देसाई गटाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर सभागृहात निवेदन सादर करताना भापती राजाभाऊ शेलार यांच्या आघाडी धर्म आणि नेत्यांचा निरोप या वक्तव्यामुळे तालुक्यात देसाई-पाटणकर गटांचे सूर पुन्हा जुळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय इतिहास देसाई-पाटणकर गटांच्या मैत्रीचे अनेक दाखले देतो. 1952 ते 1972 सालापर्यंत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून तालुक्याचे राजकारण या दोन्ही गटांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या निवडणुकीतही संस्थापक पॅनेल मधील स्व. उदयबाबा पाटणकर व स्व.भागवतराव देसाई विरुद्ध स्व. शिवाजीराव देसाई व माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. यामध्ये स्व. शिवाजीराव देसाई यांचे पॅनल या निवडणुकीत निवडून आले होते. यावेळी 14 वर्ष कारखान्याचा कारभार त्यांनी एकत्र केला होता.
मात्र नंतरच्या संघर्षामुळे देसाई-पाटणकर गटातील तणाव आणखीनच वाढत गेला. ना. देसाई यांच्या ताब्यात असणाऱ्या देसाई कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाला. मात्र यामध्ये पाटणकरांना यश आले नाही. पर्यायाने दिवसेंदिवस संघर्ष वाढत गेला. गत विधानसभा निवडणुकीत व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तेवढ्यावरच न थांबता एकमेकांचे आजारपणावरही टीका करण्यात आली होती. सध्या देसाई-पाटणकर गटांच्या संघर्षाची धार बोथट होताना दिसत आहे. त्यामुळे या गटांच्या संघर्षाचे रूपांतर मैत्रीत होणार का किंवा देसाई पाटणकर गटांच्या मैत्रीचे सुर पुन्हा जुळणार का? अशी चर्चा आहे.
दोन्ही गटांची भूमिका महत्त्वाची…
पाटण तालुक्याच्या राजकारणात दोन्ही गटांची भूमिका महत्वाची आहे. विकास कामांच्या बाबतीत तालुक्यातील अपूर्ण असलेली धरणांची कामे प्रकल्प औद्योगिकरणाची समस्या, शहराचे विस्तारीकरण ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





