बंदोबस्त असतानाही आरोपींनी घेतली होती बापू नायरची भेट
पुणे – युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कुख्यात बापू नायर याच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. तर, आरोपींना बापू नायरला भेटू दिल्याचा ठपका या 6 पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
बुधवार पेठेत दीपक मारटकर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दहा आरोपींना अटक केली आहे. खुनापूर्वी या आरोपींनी गुंड नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतल्याचे समोर आले होते. सध्या नायर कारागृहात आहे. तो उपचारासाठी ससूनमध्ये आला असता, आरोपींनी त्याची भेट घेतल्याचे तपासात समोर आले.
नायर याला ससूनमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आले होते. बंदोबस्त असतानाही आरोपी त्याला कसे भेटले, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती.
या काळात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता. त्याची दखल घेत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, कामात कुचराई करत या कर्मचाऱ्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना निलंबित केल्याचे सांगितले.