Pimpri : उद्योगांच्या पुनर्वसनासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी : महापालिकेने चिखली कुदळवाडीत केलेल्या कारवाईत अनेक उद्योजकांचे मोठे नुकसान झाले असून हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. निष्कासन कारवाईत विस्थापित झालेल्या लघुद्योजकांना चिखली येथेच विकसित औद्योगिक पार्क उभारून पुनर्वसन करावे व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.
पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे , संचालक संजय सातव आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही विषयांबाबत त्वरित बैठक घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा अजय भोसले उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, महापालिकेने 12 जानेवारी 2025 पासून सदर बांधकामे 15 दिवसांची नोटीस मुदत देऊन स्वतः काढून घेण्यास सांगितले होते, परंतु इतक्या कमी वेळेत एवढा मोठा सेटअप हलविणे शक्य नव्हते. दि. 8 फेब्रुवारी 2025 पासून सकाळी 6 वाजला सरसकट कारवाई चालू करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी कंपनीमधील मशीन, ऑफिस मधील रेकॉर्ड देखील काढून घेण्यास वेळ दिला नाही. वरील सर्व मशीनवर शॉपचा राडारोडा टाकून मशिनचे नुकसान करण्यात आले.
या परिसरातील लघु उद्योजक हे गेली 25 ते 30 वर्षापासून ग्रामपंचायत काळापासून ग्रामपंचयातीचा रितसर परवाना घेऊन उद्योग व्यवसाय करत होते. महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे सदर परिसरातील उद्योजकाचे व कामगाराचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे कामगार बेकार झाले उद्द्योजकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. उद्योजक देशोधडीला लागलेला आहे. उद्योजकाचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्याने घेतलेल्या कर्जांचे हप्ते तो वेळेवर देऊ शकत नाही.
शहरात औद्योगिक महामंडळाच्या जागाच शिल्लक नाहीत. चाकण परिसरात देखील कामगार मिळणे मुश्किल होत आहे तसेच वाहतुक कोंडीचा प्रश्न देखील उद्भवत आहे. चिखलीतील जागा या उद्द्योजकांच्या स्वतःच्या मालकीच्या असून त्यावर पालिकेनी केलेली कारवाई अन्यायकारक आहे. पालिकेने उद्योजकांच्या ७/१२ उताऱ्यावर असणारी जेवढी जागा आहे तेवढी औदयोगिक विकसित झोन निर्माण करून याच विकसित जागेत औद्योगिक पार्क करून बांधकाम सी. इ. पी. टी. एस. टी. पी. प्लांट, रोड, ड्रेनेज, एम. एस. इ. बी. पावर, पथदिवे, सहित तयार करून द्यावे ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.





