पाचोरा (जळगाव) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी झालेल्या सभेत त्यांनी स्थानिक पातळीवरील समस्या दूर करण्यासाठी मोठ्या विकास योजनांची घोषणा केली तसेच आगामी निवडणुकांसाठी लक्ष्यही निश्चित केले. शहरातील बेरोजगारीवर उपाय म्हणून शिंदे यांनी सभेतूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत पाचोरा तालुक्यात MIDC उद्योग जलदगतीने मंजूर करण्याचे निर्देश दिले. त्यासही तत्काळ हिरवा कंदील मिळाल्याने उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. तसेच दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना जाहीर करण्यात आली. गिरणा नदीवरून थेट शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सभेदरम्यान त्यांनी विरोधकांवर मिश्किल भाषेत टीका करत विकासकामांमध्ये अडथळे आणणाऱ्यांना जनता उत्तर देईल, असा इशारा दिला. आमदार किशोर पाटील यांना ‘शेर’ म्हणत, पाचोरा नगरपरिषदेतील २८ नगरसेवक स्वबळावर निवडून आणण्याचे लक्ष्य त्यांनी जाहीर केले.