सरहद्द शौर्यथॉन स्पर्धेचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्घाटन

पुणे – कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी मुख्यमंत्री असताना जाहीर केले होते. त्यानुसार दिलेला शब्द पाळत हा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.
कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद संस्था, पुणे तसेच अर्हम फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सरहद शौर्यथॉन-२०२५ या स्पर्धेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लेह १४ कॉप्स कमांडर, संजय नहार, कारगिलचे चीफ एक्झिक्युटिव्ह काउन्सेलर डॉ. जफर आखून, कारगिलचे जिल्हाधिकारी राकेश कुमार, डॉ. शैलेश पगारिया, संजीव शहा, गजानन पाटील, कौन्सेलर फिरोज खान यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील व कारगिल, द्रास येथील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी शौर्यथॉन स्पर्धा घेण्यात आली. समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुमंत वाईकर, वसंत गोखले, अनुज नहार, जाहिद भट्ट, सुयोग गुंदेचा यांनी विशेष योगदान दिले.





