अग्रलेख : भेटीगाठींचे राजकारण

महाराष्ट्रात सुमारे दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर विविध राजकीय घडामोडी सातत्याने घडत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना भेटत आहेत. नवनवीन युत्या होत आहेत. नवीन मैत्रीसंबंध निर्माण होत आहेत आणि जुनी मैत्री बंदही होत आहे. राज्यात आगामी कालावधीमध्ये अनेक महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने आणि दोन वर्षातच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने या भेटीगाठींच्या राजकारणाचा वेग वाढला नसता तरच नवल.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात संभाजी ब्रिगेडशी युती केल्याची घोषणा केल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा झाली असली या निमित्ताने एक नवीन मैत्रीसंबंध राज्यात प्रस्थापित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या विविध प्रकारच्या गाठीभेटी यांचा विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची गुपचूप भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीबाबत अधिकृतपणा नाकारण्यात येत असला तरी भल्या सकाळी या दोन नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट होऊन चर्चा झाली अशी माहिती आता उपलब्ध होत आहे.
या भेटीगाठी नंतर दोनच दिवसांनंतर भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी आपण राज ठाकरे यांना भेटल्याचे नाकारले नाही. उलट याबाबतची छायाचित्रे सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. आठवडाभराच्या कालावधीमध्ये एका पक्षाचे तीन महत्त्वाचे नेते राज ठाकरे यांना भेटत असतील, तर त्याचा निश्चितच काहीतरी अर्थ आहे हे समजून घ्यावे लागणार आहे. जर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली तर भाजपला राज ठाकरे यांच्यासारखा मित्र निश्चितच हवा आहे. आगामी सर्व निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या गटासोबतच लढवल्या जातील अशी घोषणा फडणवीस आणि भाजपाचे इतर नेत्यांनी केली असली तरी भाजपने इतर कोणाशी मैत्री करू नये अशी कोणत्याही प्रकारची अट एकनाथ शिंदे यांनी घातली नसल्यानेच या सर्व घडामोडी केल्या जात आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी मतदारांची मते निश्चितच महत्त्वाची ठरणार आहेत. याच मतदारांच्या भांडवलावर आपण पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत सत्तेवर येऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत आहे; पण उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारा जो मराठी मतदार आहे त्यामध्ये जर विभागणी करायची असेल तर राज ठाकरे यांच्यासारख्या मराठी मतदारांचा पाठिंबा असणारा एखादा नेता आपल्यासोबत असावा या हेतूने भाजप नेत्यांनी ही राजकीय पेरणी सुरू केली असावी हे उघड आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभा निश्चितच परिणामकारक ठरू शकतात हे आजपर्यंत सिद्ध झाले आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवर नजर टाकली तर शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपने उदारपणा दाखवून शिवसेनेला महापौर करण्यासाठी परवानगी दिली होती. यावेळी मात्र शिवसेनापेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष असल्याने त्यांना राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याची आणि त्यांच्या पक्षाची मैत्री निश्चितच हवी आहे.
अर्थात गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला फक्त सातच जागांवर विजय मिळाला होता. त्यापैकी सहा नगरसेवक नंतर शिवसेनेमध्ये सामील झाले होते, हे वास्तवही या ठिकाणी विसरून चालणार नाही. अर्थात, महाराष्ट्राच्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सत्ता राखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केले जातील आणि मुंबई महापालिका जर उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेण्यात भाजपाला यश मिळाले तर तो भाजपाचा आणि एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा राजकीय विजय मानला जाणार आहे. अशा प्रकारचा विजय मिळवत कोणतीही राजकीय कसर बाकी राहू नये याच एका दृष्टिकोनातून राज ठाकरे यांच्याबरोबर भेटीगाठी आणि चर्चा वाढल्या असाव्यात. या आठवड्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ केंद्रीय नेते अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यावेळी सुद्धा ते राज ठाकरे यांची भेट घेऊ शकतात अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत.
राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना मी कधीच कोणाशी युती करणार नाही, अशा प्रकारची विधाने केली आहेत, पण भाजपासारख्या शक्तिमान पक्षाबरोबर युती करून सत्तेत सहभाग मिळू शकत असेल तर राज ठाकरे आपल्या या धोरणाला थोडी मुरड घालू शकतात. एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण होत असतानाच आणि आगामी निवडणुका ही आघाडी एकत्रितपणे लढवणार की नाही याबाबत कोणतीच खात्री सध्या देण्यात येत नसताना दुसरीकडे भाजपने मात्र मतदारांचा पाया भक्कम करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कधीच मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत वाटेकरी नको आहेत. एक तर मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फारसा प्रभाव नाही आणि कॉंग्रेस पक्ष सध्या संघटनात्मकदृष्ट्या विस्कळीत झाल्याने त्या पक्षाचा आपल्याला कितपत फायदा होईल याबाबत उद्धव ठाकरे यांना शंका असू शकते.
गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक झाली. ती पाहता भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे आव्हान परतवून लावण्यासाठी तसेच महापालिका निवडणुकासुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत; पण आखाड्यात दोन पैलवान जसे एकमेकांच्या शक्तीचा प्रथम अंदाज घेत असतात आणि नंतर चढाई करतात त्याच पद्धतीने सध्या महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या भेटीगाठी हे याच राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे





