जातीयवादामुळे शासकीय नोकरीपासून वंचित; आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

नाशिक : मी आदिवासी असल्याने जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सरकारवर केला आहे. कविताच्या आरोपानंतर आता आदिवासी लोकप्रतिनीधीनींही सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. तर कविता राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
धावपटू कविता राऊत यांच्या आरोपानंतर आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन येथे मागील चार दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. कविता राऊत यांनी आदिवासी विकास भवन परिसरात होणार्या आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना कविता राऊत यांनी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. माझी ज्युनिअर खेळाडू कविता बाबर यांनी माझ्याबरोबर पदवी प्राप्त केली. माझ्यापेक्षा कमी पदकं असताना देखील गट ‘अ’ मध्ये त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. परंतू माझ्यासोबत जातीयवाद करून 10 वर्षापासून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा थेट आरोपच कविता राऊत यांनी केला आहे.
धावपटू कविता राऊतने राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. चीनमधील आशियाई स्पर्धा 2011, भारतातील दक्षिण आशियाई स्पर्धा, ब्राझील येथील ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची मान उंचावतात, त्यांना शासकीय नोकरीत स्थान दिले जाते.
यासाठी शिक्षण आणि वयाची अट शिथिल केली जाते. कविता राऊत यांनी 2014 मध्ये शासकीय नोकरीसाठी अर्ज दिला होता. शैक्षणिक अर्हतेनुसार राऊत या गट क मधील पदासाठी पात्र असूनही त्यांना अगोदर पदवी प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कविता राऊत यांनी 2017 मध्ये पदवीचे प्रमाणपत्र शासनाला सुपूर्द केले. 2018 मध्ये शासनाने 32 खेळाडूंना नियुक्ती दिली. मात्र त्यात राऊत यांना स्थान देण्यात आले नाही.
मी आदिवासी असल्याने जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासकीय धोरणाप्रमाणे नोकरीपासून अनेकवेळा अर्ज देऊनही माझ्या अर्जाकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे.
कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू





