हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले यांची माहिती : ऊस तोडणी, वाहतूकदारांची बिले लवकरच
बिजवडी – इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची हंगाम 2018-19 मधील गाळप झालेल्या ऊसाची उर्वरित संपूर्ण एफआरपीची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी दिली.
कर्मयोगी कारखान्याने मागील हंगाम 2018-19 मध्ये 10 लाख 48 हजार 216 मेट्रिक टन गाळप केले होते. या गाळप केलेल्या ऊसासाठी कारखान्याने आतापर्यंत एफआरपी पोटी 235 कोटी 85 लाख रक्कम सभासदांना अदा केलेली आहे. उर्वरित रक्कम आज वर्ग करीत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. बॅंकांना सलग सुट्टयांमुळे सभासदांच्या खात्यावर जमा होण्यात एखादा दिवस विलंब होवू शकतो.
कारखान्याने केंद्र शासनाच्या नियमानुसार मागील हंगामात उत्पादित झालेल्या साखरेपैकी कारखान्याने शासनाच्या निर्यात धोरणानुसार 4 लाख 70 हजार 880 क्विंटल साखर परदेशात निर्यात करावी लागली. ही साखर निर्यात केल्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचे देश पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कर्मयोगी कारखान्यास मिळाले आहे. त्याचा बक्षिस वितरण समारंभ नवी दिल्ली येथे दि. 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. ऊस बिलाबरोबर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूकदारांच्या रकमा लवकरात लवकर संबंधितांना वर्ग करीत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कारखान्याच्या येत्या गाळप हंगामासाठीची हाफ सिझनमधील कामाची तयारी प्रगतीपथावर आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. उजनी धरण मागील वर्षी 108 टक्के भरले होते. परंतु कार्यक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उजनी पाणी पातळी कमालीची खालाविली. तसेच कालव्याचे पाणी ऊस उत्पादकांना न मिळाल्याने येत्या गाळप हंगामासाठी उसाची उपलब्धता कमालीची घटली आहे.
जनावरांच्या छावणीसाठी उसाचा पुरवठा झाल्यामुळे त्याचाही परिणाम उसाच्या उपलब्धतेवर होणार आहेत. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, पांडुरंग गलांडे, वसंत मोहोळकर, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, रमेशराव जाधव, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, संचालिका जयश्री नलवडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, विभाग प्रमुख उपस्थित होते.